संगमेश्वर: संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथील तुळजाभवानी नगर परिसरात ३१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ५९ वर्षीय मनोहर आत्माराम मेस्त्री यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुमार-ओम रामकृष्ण मेस्त्री (वय २०) हे आपल्या दुचाकीवरून (क्रमांक MH/05/AA/9486) चुलते मनोहर मेस्त्री यांना कामावर सोडण्यासाठी साडवलीकडे जात होते. संगमेश्वर ते देवरुख मार्गावर मौजे साडवली येथे पोहोचले असता, पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव बोलेरो निओ कारने (क्रमांक MH/01/EJ/4606) त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. कारचालक प्रतीक नरेश शिंदे (वय २५, रा. मुंबई) हा दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात होता, त्याचवेळी ही धडक बसली.
या अपघातात दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले. यामध्ये मनोहर मेस्त्री यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय देवरुख येथे दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात ३१ डिसेंबर रोजी दुपारी १६:१५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.












