पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांच्याकडून विशेष गौरव
सावंतवाडी । प्रतिनिधी :जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर वेत्ये सारख्या एका छोट्या गावातील सुयोग रमेश गावकर या युवकाने ‘एमबीबीएस’ (MBBS) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल सावंतवाडीचे पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांच्याकडून त्याचा विशेष सत्कार करून गौरव करण्यात आला.
सावंतवाडीचे माजी सभापती रमेश गावकर यांचे सुपुत्र असलेल्या सुयोगने मिळवलेल्या या यशामुळे संपूर्ण वेत्ये गावाचे नाव वैद्यकीय क्षेत्रात उंचावले आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित सत्कार समारंभात बोलताना जितेंद्र गावकर म्हणाले की, “वेत्ये सारख्या ग्रामीण भागातील युवक डॉक्टर होणे ही संपूर्ण गावासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि भूषणावह गोष्ट आहे. सुयोगने घेतलेले अथक परिश्रम, त्याची मेहनत आणि जिद्दीचे आज खऱ्या अर्थाने सार्थक झाले आहे.”
पुढे बोलताना त्यांनी युवकांना आवाहन केले की, प्रत्येक विद्यार्थ्याने जर मनाशी पक्की जिद्द बाळगून परिश्रम घेतले, तर ते आपल्या जीवनात निश्चितच एक वेगळी उंची गाठू शकतात. सुयोगने डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून ते पूर्ण केले आणि आपल्या आई-वडिलांसह गावाचेही नाव मोठे केले आहे. त्याचा हा खडतर आणि यशस्वी प्रवास गावातील व परिसरातील इतर मुलांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच सुयोगने वैद्यकीय क्षेत्रात अशीच उत्तरोत्तर प्रगती करावी, अशा सदिच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.
या विशेष सत्कार सोहळ्याला बाबुराव तेंडुलकर, संतोष गावडे, रमेश गावकर, तनवी गावकर यांच्यासह गावातील अनेक मान्यवर, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुयोगच्या या यशामुळे संपूर्ण वेत्ये गावातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.












