नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून नागरिकांना वृक्ष भेट

खेड : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, खेडच्या वतीने तालुक्यातील नागरिकांना वृक्ष भेट देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नागरिकांनी अधिकाधिक वृक्ष लागवड करावी आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी योगदान द्यावे, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वृक्षांचे महत्त्व आणि वाढत्या पर्यावरणीय समस्यांच्या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धनाची गरज अधोरेखित करत भाजप पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना वृक्षांचे वाटप केले. यावेळी वृक्षारोपणासोबतच वृक्षांचे संगोपन करण्याचे आवाहनही करण्यात आले.
कार्यक्रमाला भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीम सहीबोले, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा महिला मोर्चा खेड शहर उपाध्यक्ष प्रीती चिखले, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड यांच्यासह चेतन धामणकर, डॉ. विक्रांत पाटील, स्वरूप दळी, स्वराज गांधी, अक्षय जांभूळकर, प्रदीप भोसले तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला असून, अशा उपक्रमांमुळे समाजामध्ये वृक्ष लागवडीबाबत जनजागृती निर्माण होण्यास मदत होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.