योग शिबिरार्थींनी व्यक्त केली गुरुप्रति श्रद्धा
सावंतवाडी:फिटनेस योग फाऊंडेशन महाराष्ट्र अंतर्गत आयोजित योग शिक्षक प्रशिक्षण शिबिरामध्ये आज गुरुपौर्णिमा महोत्सव अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात पार पडला. सावंतवाडी येथील जिमखाना हॉलमध्ये आज बुधवारी पहाटे ५.३० या विशेष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचा प्रारंभ महर्षी व्यास मुनी, महर्षि पतंजली, आदि योगी भगवान शिव आणि परम पूज्य स्वामी रामदेव बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन आणि सामूहिक प्रार्थनेने झाला. याप्रसंगी उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थींनी आपल्या गुरूंच्या चरणी पुष्प अर्पण करून श्रद्धा व्यक्त केली. कार्यक्रमा दरम्यान उपस्थितांना गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व, योगातील गुरूंचे अनन्यसाधारण स्थान आणि मानवी जीवनात गुरूंची भूमिका या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
या महोत्सवाच्या निमित्ताने विशेष सामूहिक योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक योगसाधकांनी सहभाग घेऊन आपापली मनोगते व अनुभव व्यक्त केले.
या कार्यक्रमास योग शिक्षक शेखर बांदेकर, फिटनेस युवा अकॅडमीचे जिल्हाध्यक्ष नारायण सावंत, फिटनेस किड्स अकॅडमीचे जिल्हाध्यक्ष विशाल लातये, फिटनेस महिला अकॅडमीच्या जिल्हाध्यक्षा सौ. रसिका सावंत, सावंतवाडीच्या नगरसेविका सौ. सीमा नाईक, आणि हिरकणी वस्तीस्तर संघाच्या अध्यक्षा सौ. प्रगती बामणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासह योग शिक्षक प्रशिक्षणार्थी, योगसाधक आणि आसपासच्या गावांतील योगाभ्यास प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी फिटनेस योग फाऊंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.











