दोडामार्ग तालुक्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी: अनेक कॉजवे पाण्याखाली, तिलारी नदी इशारा पातळीजवळ!

दोडामार्ग | प्रतिनिधी :दोडामार्ग तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. संततधार पावसामुळे नदी, नाले आणि ओहोळांना पूर आला असून अनेक लहान-मोठे कॉजवे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे विविध गावांचा परस्पर संपर्क तुटला असून वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. जोरदार वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली असून वीजपुरवठाही खंडित झाला आहे.

मागील काही दिवस पावसाची तीव्रता कमी होती; मात्र रविवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने सोमवारी दुपारनंतर अधिक जोर धरला. सततच्या पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत, तर गटारे तुडुंब भरल्याने पाणी रस्त्यांवर साचले. दोडामार्ग शहरातील मुख्य राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने काही काळ परिसराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. ‘बँक ऑफ इंडिया’ शाखेसमोरील राज्यमार्गही पाण्याखाली गेल्याने वाहनचालकांना अत्यंत सावधगिरीने मार्गक्रमण करावे लागले.

तसेच, घोटगेवाडी, परमे, कुडासे आदी भागांतील कॉजवे पाण्याखाली गेल्यामुळे या गावांचा संपर्क काही काळासाठी पूर्णपणे खंडित झाला.

 

तिलारी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग नदी नाले तुडुंब भरले!!!!

 

तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. सध्या धरणातील पाणीसाठा ८५.५० टक्क्यांवर पोहोचला असून धरणातून सुमारे ३१२.०६ घ.मी./से. वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच तेरवण-मेढे उन्नयी बंधाऱ्यातून ६३.२२ घ.मी./से. पाण्याचा विसर्ग होत असून हे पाणी थेट तिलारी नदीत मिसळत असल्याने नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे.

 

तिलारी नदी इशारा पातळीच्या उंबरठ्यावर; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

 

 

तिलारी नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत असून ती इशारा पातळीच्या अतिशय समीप पोहोचली आहे. त्यामुळे नदीकाठच्या सखल भागात पाणी शिरण्यास सुरुवात झाली असून फळबागा आणि शेतीचे क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, अनेक ठिकाणी झाडे पडल्याने वाहतुकीत मोठे अडथळे निर्माण झाले असून तालुक्याातील बहुतांश गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना विविध गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.