नगराध्यक्षा श्रद्धा राजे भोसले यांचे उपक्रमाला खंबीर पाठबळ
सावंतवाडी । प्रतिनिधी :
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी ‘सक्षम स्त्री फाउंडेशन’च्या वतीने ‘माय ट्रॅव्हलाईट सखी इनिशिएटिव्ह’च्या माध्यमातून एका विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या द्वारे गृहिणींना घरच्या घरी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मानस कंपनीच्या वतीने व्यक्त करण्यात आला. फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा नगरसेविका सौ. नीलम परिमल नाईक यांनी या उपक्रमासाठी विशेष पुढाकार घेतला असून भविष्यातही महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि रोजगारासाठी अशाच प्रकारे विशेष प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
गुरुपौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर पारंपरिक पद्धतीला छेद देत गोशाळेत गोसेवेचा संदेश देऊन ‘सक्षम स्त्री फाउंडेशन’ची आगळ्यावेगळ्या आणि प्रेरणादायी वातावरणात स्थापना करण्यात आली होती. स्थापनेच्या वेळीच फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी महिला स्वावलंबन, शिक्षण, आरोग्य आणि स्वयंरोजगारासाठी निःस्वार्थपणे कार्य करण्याची प्रतिज्ञा केली होती. त्याच संकल्पाचा एक भाग म्हणून या रोजगार मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सावंतवाडीच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धा राजे भोसले प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच सक्षम स्त्री फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. नीलम परिमल नाईक, माय ट्रॅव्हलाईट सखी इनिशिएटिव्हचे संचालक श्री. नितीन येरुणकर, श्री. निलेश उपाध्याय, सौ. रिद्धी कांबळी, फाउंडेशनच्या उपाध्यक्षा नगरसेविका सौ. सुनीता पेडणेकर, सचिव सौ. मेघा राणे-गावडे, खजिनदार नगरसेविका सौ. दुलारी रांगणेकर आणि सहसचिव सौ. अंकिता बांदेकर-नेवगी यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या प्रास्ताविक व अध्यक्षीय भाषणात सौ. नीलम नाईक यांनी फाउंडेशनच्या कार्याचे महत्त्व विशद केले. फाउंडेशनची व्याप्ती ही केवळ रोजगारापुरती मर्यादित नसून शिक्षण, आरोग्य, सांस्कृतिक, क्रीडा आणि करमणूक या समाजभिमुख घटकांशी निगडित आहे, असे सांगतानाच महिला सबलीकरण हेच आपले मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धा राजे भोसले यांनी आपल्या भाषणात या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. महिला सक्षमीकरणाचे हे उद्दिष्ट अत्यंत गौरवशाली असून आपल्या शहरात अशा उपक्रमांचे नेहमीच स्वागत आहे. अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांना उत्तेजन देण्यासाठी आणि महिलांच्या उन्नतीसाठी आपण व आपले नगरपरिषद प्रशासन सक्षम स्त्री फाउंडेशनच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
माय ट्रॅव्हलाईट सखी इनिशिएटिव्हचे संचालक यांनी पर्यटन क्षेत्रातील वाढत्या संधींवर प्रकाश टाकला. पर्यटन हा सध्याचा अत्यंत लोकप्रिय आणि व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी विषय असून या माध्यमातून महिलांना घरबसल्या सोप्या पद्धतीने रोजगार मिळवता येणे शक्य आहे, असे त्यांनी सांगितले.
तसेच सक्षम स्त्री फाउंडेशनच्या कार्याचा गौरव करत महिला सक्षमीकरणासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य कंपनीतर्फे पुरवले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन कु. खुशी नाईक व सौ. अंकिता बांदेकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सचिव सौ. मेघा राणे-गावडे यांनी मानले. या मार्गदर्शन शिबिराला ३०० पेक्षा जास्त महिलांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावून या उपक्रमात सक्रिय सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.











