रामदास कदम, योगेश कदम यांच्या पाठपुराव्याला प्रतिसाद; सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री. पावशे यांच्याकडून स्थळपाहणी
खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील आजी-माजी सैनिक, वीरमाता-पिता, वीरपत्नी, विधवा तसेच सैनिकांच्या पाल्यांसाठी आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त भव्य सैनिक संकुल उभारण्याच्या मागणीला आता महत्त्वपूर्ण गती मिळाली आहे. शिवसेना नेते रामदास कदम आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे आजी-माजी सैनिक संघटना, खेड यांच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी खेड येथील जुन्या सैनिक वसतिगृह व सैनिक विश्रामगृहाची प्रत्यक्ष पाहणी केली.
खेड तालुक्यातील सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी सन १९४६ मध्ये खेड येथे सैनिकी मुलांचे वसतिगृह तसेच सैनिक विश्रामगृह उभारण्यात आले होते. या वास्तूंना खेडच्या सैनिक कल्याणाच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. अनेक वर्षे सैनिक, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना विविध प्रकारे या वास्तूंचा उपयोग होत आला आहे. मात्र, कालांतराने दोन्ही इमारतींची अवस्था अत्यंत जीर्ण झाली असून, त्या मोडकळीस आलेल्या आहेत. त्यामुळे जुन्या इमारतींची पुनर्बांधणी करून त्याच ठिकाणी सर्व आधुनिक सुविधांनी युक्त असे भव्य सैनिक संकुल उभारण्यात यावे, अशी मागणी सैनिक संघटनेकडून करण्यात आली होती.
या मागणीसाठी शिवसेना नेते रामदास कदम आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे आजी-माजी सैनिक संघटनेने विशेष पाठपुरावा केला. खेड तालुक्यातील सैनिकांच्या समस्या, माजी सैनिकांना भेडसावणाऱ्या अडचणी, सैनिकांच्या कुटुंबीयांना आवश्यक असलेल्या सुविधा तसेच त्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक गरजा याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दोन्ही नेत्यांच्या निदर्शनास बाबी आणून दिल्या होत्या.
सैनिक संघटनेच्या या मागणीची दखल घेत योगेश कदम यांच्या माध्यमातून संबंधित विभागाला आवश्यक कार्यवाहीचे निर्देश देण्यात आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग, खेडचे अभियंता श्री. पावशे यांनी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान विद्यमान इमारतींची स्थिती, परिसरातील उपलब्ध जागा आणि भविष्यातील पुनर्बांधणीच्या दृष्टीने आवश्यक बाबींची पाहणी करण्यात आली.
प्रस्तावित सैनिक संकुलामध्ये सैनिक व माजी सैनिकांसाठी विविध शासकीय योजनांची माहिती व त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी आहे. तसेच सैनिकांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन, वीरमाता-पिता, वीरपत्नी आणि विधवा यांच्यासाठी आवश्यक कल्याणकारी योजनांची माहिती व प्रशासकीय मदत उपलब्ध व्हावी, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे हे संकुल केवळ विश्रामगृह किंवा वसतिगृह न राहता सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी सर्वसमावेशक सुविधा केंद्र म्हणून विकसित करण्याची भूमिका सैनिक संघटनेने मांडली आहे.
शिवसेना नेते रामदास कदम आणि योगेश कदम यांच्या पुढाकारामुळे या मागणीला प्रशासकीय पातळीवर चालना मिळाल्याची भावना आजी-माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत असलेल्या या इमारतींच्या जागी नवीन आणि आधुनिक संकुल उभारल्यास खेड तालुक्यातील सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना मोठा फायदा होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
स्थळपाहणीच्या वेळी खेड नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक श्री. निकेतन पाटणे, नगरसेविका सौ. रसिका ताई खेडेकर, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक श्री. सुनील कदम, आजी-माजी सैनिक संघटना खेडचे अध्यक्ष सुभेदार मेजर डी. डी. आखाडे, उपाध्यक्ष श्री. काशीराम सकपाल, सचिव श्री. निलेश मोरे, खजिनदार श्री. निकम आदी उपस्थित होते.
याशिवाय श्री. दौलत चव्हाण, श्री. दिलीप भोसले (तिसंगी), श्री. जंगम, श्री. मोरे (ऐनवली), श्री. खेडेकर (खेड), श्री. जाधव (धवडे) यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि आजी-माजी सैनिक उपस्थित होते. सैनिक संघटना शिवतरचे अध्यक्ष श्री. शिवाजी मोरे, श्री. सूर्यकांत मोरे आणि श्री. बळीराम मोरे यांनीही या स्थळपाहणीत सहभाग घेतला.
सैनिकांच्या त्यागाचा आणि देशसेवेचा सन्मान राखण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही समाजाची आणि शासनाची जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर खेड येथे आधुनिक सैनिक संकुल उभारण्याची मागणी महत्त्वाची मानली जात आहे. रामदास कदम आणि योगेश कदम यांच्या माध्यमातून या मागणीला मिळालेली दखल आणि त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झालेली प्रत्यक्ष स्थळपाहणी यामुळे सैनिक संकुलाच्या उभारणीच्या दिशेने पुढील प्रशासकीय कार्यवाहीचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
आता या प्रकल्पासाठी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया, प्रस्ताव, प्रशासकीय मंजुरी आणि निधी उपलब्धतेबाबत पुढील कार्यवाहीकडे खेड तालुक्यातील आजी-माजी सैनिकांचे लक्ष लागले आहे. सैनिकांच्या त्यागाची जाणीव ठेवून त्यांच्या तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या भविष्यासाठी सुसज्ज आणि सर्वसमावेशक सैनिक संकुल प्रत्यक्षात उभे राहावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.












