लालबहादूर शास्त्री हायस्कूल दहागाव मध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

मंडणगड प्रतिनिधी:  लालबहादूर शास्त्री हायस्कूल, दहागाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीचे औचित्य साधून प्रशालेमध्ये भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता ५ वी ते ७ वी आणि इयत्ता ८ वी ते १० वी अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या सत्य, अहिंसा आणि शास्त्रीजींच्या ‘जय जवान जय किसान’ या विचारांवर आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेचे मुख्याध्यापक विजय खाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
प्रशालेतील शिक्षक किशोर कासारे आणि श्री. विक्रम शेले यांनी विद्यार्थ्यांना महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याविषयी सविस्तर माहिती दिली. साधी राहणी व उच्च विचारसरणी, देशभक्ती आणि प्रामाणिकपणा हे गुण आजच्या युवा पिढीने आत्मसात करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापक विजय खाडे म्हणाले, “गांधीजींचा सत्याचा आणि शास्त्रीजींचा साधेपणाचा आदर्श प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या जीवनात अंगीकारला पाहिजे, तरच त्यांच्या जयंतीचे खरे सार्थक होईल.”

या कार्यक्रमाला प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी रुद्र सुखदरे आणि मयुरेश पडवेकर यांनी उत्कृष्टपणे केले, तर शालेय सांस्कृतिक विभागाने कार्यक्रमाचे नियोजन केले. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.