आ. शेखर निकमांच्या मागणीची मंत्री राणेंकडून दखल
चिपळूण (प्रतिनिधी) : शहर व परिसराला वारंवार बसणाऱ्या पुराच्या तडाख्याच्या पार्श्वभूमीवर वाशिष्ठी खाडीतील गाळ काढण्याचा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाशिष्ठी खाडीतील सीआरझेड हद्दित असलेला गाळ काढण्याबाबत आमदार शेखर निकम यांनी बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नीतेश राणे यांच्याकडे केलेल्या मागणीची दखल घेण्यात आली असून, यासंदर्भात २२ ऑक्टोबर रोजी मुंबईत उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे खाडीतील गाळ काढण्याच्या कामाला आता निर्णायक दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सन २०२१ मधील महापुरानंतर जलसंपदा विभागाकडून वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र गोवळकोटच्या पुढील भागातील वाशिष्ठी नदीचा परिसर सीआरझेडच्या कक्षेत तसेच महाराष्ट्र सागरी मंडळ कार्यक्षेत्रात येत असल्याने या भागातील गाळ काढण्याच्या कामास अडथळे निर्माण झाले आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात गाळाचे ढिगारे तयार झाले असून, नदीपात्रातील प्रवाहावर त्याचा परिणाम होत आहे. भविष्यात मुसळधार पावसाच्या काळात पाण्याचा निचरा कमी झाल्यास पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका असल्याचे आमदार निकम यांनी आपल्या पत्रातून निदर्शनास आणून दिले आहे. आ. निकम यांनी बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांच्याकडे संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन गाळ काढण्याबाबत सकारात्मक व ठोस निर्णय घेण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत बंदरे विभाग व मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने २२ रोजी दुपारी १ वाजता मुंबईतील मंत्रिमंडळाच्या दालन क्रमांक २मध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस आमदार निकम यांच्यासह बंदरे व परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव, पर्यावरण सचिव, मत्स्यव्यवसाय सचिव, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मत्स्यव्यवसाय आयुक्तांना निमंत्रित करण्यात आले आहे.













