लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या उपक्रमाला सहकार्य
अध्यक्ष डॉ. अरविंद पोतदार यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द
चिपळूण (प्रतिनिधी) : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या रामभाऊ साठे वस्तुसंग्रहालयाच्या उभारणी व विकासासाठी सती येथील शुभंकरोती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने २५ हजार रुपयांची देणगी देण्यात आली आहे. पतसंस्थेच्या या योगदानामुळे ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या आणि पुढील पिढ्यांना तो परिचित करून देण्याच्या उपक्रमाला सहकार्य लाभले आहे. शुभंकरोती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. अरविंद पोतदार यांनी देणगीचा धनादेश लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी पतसंस्थेचे सचिव श्री संजय इंदुलकर, उद्योजक श्री अजय देसाई आणि ज्येष्ठ लेखक श्री प्रकाशकाका देशपांडे उपस्थित होते. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या माध्यमातून वाचनसंस्कृतीचा प्रसार, साहित्यिक उपक्रमांचे आयोजन तसेच ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. या कार्यातील महत्त्वाचा भाग असलेल्या रामभाऊ साठे वस्तुसंग्रहालयाच्या माध्यमातून ऐतिहासिक वस्तू, आठवणी आणि सांस्कृतिक ठेव्याचे जतन करण्यास मदत होणार आहे. सामाजिक व सांस्कृतिक संस्थांनी अशा उपक्रमांना आर्थिक सहकार्य केल्यास स्थानिक इतिहास आणि परंपरा जतन करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळते. शुभंकरोती पतसंस्थेने दिलेली २५ हजार रुपयांची देणगी ही या सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरली आहे. या देणगीबद्दल लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने शुभंकरोती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे आभार व्यक्त करण्यात आले.











