पोफळी येथे बंद घराचा कडी-कोयंडा तोडून पावणेतीन लाखांचे दागिने लंपास

चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील पोफळी येथील वीज मंडळाच्या वसाहतीत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडी-कोयंडा तोडून सुमारे पावणेतीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस संशयितांचा माग काढत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पोफळी येथील एम.एस.ई.बी. कॉलनी, न्यू क्लास-३ मधील सदनिका क्रमांक ९२/२ मध्ये राहणारे वरिष्ठ तंत्रज्ञ वर्ग-२ वैभव वसंत सकपाळ (४१) यांचे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी हा डल्ला मारला. २९ ऑक्टोबरच्या रात्री पावणेनऊ ते ३० ऑक्टोबरच्या सकाळी साडेसात या कालावधीत ही घटना घडली. अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाची कडी आणि कोयंडा तीक्ष्ण हत्याराच्या सहाय्याने तोडून आत प्रवेश केला आणि घरातील मौल्यवान ऐवजावर हात साफ केला.
या चोरीत चोरट्यांनी ३१ ग्रॅम वजनाची सोन्याची लोटस चेन, तीन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र, दोन सोन्याच्या अंगठ्या, कानातील सोन्याच्या रिंगा, लक्ष्मी टॉप्स असा ऐवज आणि दहा हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण २ लाख ९६ हजार ५६९ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. दुसऱ्या दिवशी सकाळी चोरीचा हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. वैभव सकपाळ यांनी तातडीने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली.
त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पथकाने घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला असून परिसरातील संशयित हालचाली आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. भरवस्तीत झालेल्या या धाडसी चोरीमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.