दंतचिकित्सा क्षेत्रात डॉ. सायली भोजने यांची उल्लेखनीय कामगिरी!

 आ. शेखर निकम यांच्याकडून विशेष अभिनंदन

चिपळूण (प्रतिनिधी) : वैद्यकीय क्षेत्रात आपल्या ज्ञान, कौशल्य आणि सेवाभावी वृत्तीच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या चिपळूणच्या कन्या डॉ. सायली अरुण भोजने यांनी दंतचिकित्सा क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, दर्जेदार रुग्णसेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा समन्वय साधत त्यांनी केलेली वाटचाल कौतुकास्पद ठरत आहे. त्यांच्या या यशाबद्दल चिपळूणसह विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दंतचिकित्सा क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या डॉ. सायली भोजने यांनी रुग्णांच्या दंतआरोग्याची काळजी घेताना आधुनिक उपचारपद्धती आणि रुग्णकेंद्रित सेवेला प्राधान्य दिले आहे. विशेषतः ग्रामीण भागातील रुग्णांपर्यंत दंतआरोग्यविषयक सेवा पोहोचविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या या कार्यातून वैद्यकीय व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याची भूमिका अधोरेखित होत आहे. डॉ. सायली भोजने यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. चिपळूणच्या कन्येने वैद्यकीय क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने मिळविलेले यश अभिमानास्पद असल्याचे सांगत त्यांनी डॉ. सायली यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी आ. शेखर निकम म्हणाले की, डॉ. सायली भोजने यांची दंतचिकित्सा क्षेत्रातील कामगिरी खरोखरच उल्लेखनीय आहे. चिपळूणच्या कन्येने वैद्यकीय क्षेत्रात मिळविलेले हे यश इतर विद्यार्थिनी आणि नवोदित डॉक्टरांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. रुग्णसेवेची बांधिलकी जपत त्यांनी अशीच प्रगती करावी. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
डॉ. सायली यांच्या या यशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चिपळूण शहराध्यक्ष मिलिंद कापडी, त्यांचे वडील अरुणशेठ भोजने, सौ. भोजने, पनवेलचे उपायुक्त वैभव विधाते व सौ. विधाते, चिपळूण नगरपरिषदेचे नवनिर्वाचित उपमुख्याधिकारी अनंत मोरे, चिपळूण अर्बन बँकेचे संचालक समीर जानवलकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर कार्याध्यक्ष उदय ओतारी, रत्नागिरी जिल्हा सोशल मीडियाचे सचिन साडविलकर, विजय भुवड, वरुण (दादू) गुडेकर, विश्वनाथ कांबळे, राजा कदम आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. चिपळूणच्या मातीतून घडलेल्या डॉ. सायली भोजने यांनी दंतचिकित्सा क्षेत्रात केलेली प्रगती ही स्थानिकांसाठी अभिमानाची बाब ठरत आहे. त्यांच्या यशस्वी वाटचालीमुळे वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणींनाही प्रेरणा मिळणार असून, भविष्यात त्यांच्या हातून अधिकाधिक रुग्णसेवा घडावी, अशा सदिच्छा व्यक्त केल्या जात आहेत.