संदीप साटम यांचे प्रतिपादन
चाफेड येथे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
शिरगांव (प्रतिनिधी) :पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात ग्रामीण भागाच्या विकासाला प्राधान्य दिले जात आहे. रस्ते, पाणी आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधा सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी चाफेड येथे केले.
देवगड तालुक्यातील चाफेड मुख्य रस्ता ते श्रीदेव गांगेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ मंगळवारी भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. ग्रामस्थांच्या मागणीनुसार जिल्हा नियोजन समितीमधून या कामासाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणामुळे ग्रामस्थांसह मंदिरात येणाऱ्या भाविकांची मोठी सोय होणार आहे. हे काम प्रत्यक्षात सुरू होत असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
ग्रामीण भागातील प्रत्येक गाव विकासाच्या प्रवाहात आणण्याचा मानस असून, गावागावांतील मूलभूत समस्या सोडविण्यासाठी यापुढेही प्रयत्नशील राहणार असल्याचे संदीप साटम यांनी सांगितले.
यावेळी भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजेंद्र शेट्ये, मंगेश लोके, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष नार्वेकर, चाफेडचे सरपंच साहिल पांचाळ, ग्रामपंचायत सदस्य सुनील कांडर, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सत्यवान भोगले, विजय परब, प्रकाश मोंडकर, प्रदीप घाडी यांच्यासह गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.












