मोकाट श्वानांच्या निर्बिजीकरण व लसीकरणासाठी देवगड-जामसंडे नगरपंचायतीची नियोजनबद्ध कार्यवाही

मोकाट श्वानांच्या निर्बिजीकरण व लसीकरणासाठी देवगड-जामसंडे नगरपंचायतीची नियोजनबद्ध कार्यवाही

देवगड : प्रतिनिधी

देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांची सुरक्षितता, सार्वजनिक आरोग्य आणि प्राण्यांचे कल्याण लक्षात घेऊन मोकाट श्वानांच्या निर्बिजीकरण व लसीकरणाची मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. या कामासाठी प्रतापराव राणे एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत १५३ मोकाट श्वानांचे निर्बिजीकरण व लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. अशी माहिती देवगड जमसांडे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हरिदत्त माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

अनियमितता आढळल्याने संबंधित एजन्सीला कारवाईचे आदेश

प्राणी जन्म नियंत्रण (ABC) नियम, २०२३ मधील नियम ९ (४) नुसार नगरपंचायतीने स्थानिक प्राणी जन्म नियंत्रण समिती स्थापन केली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या SUO MOTU WRIT PETITION (CIVIL) क्रमांक ५/२०२५ मधील निर्देशांचे पालन करून ही मोहीम राबविण्यात येत आहे.

नगरपंचायतीच्या नागरी सुविधा केंद्रामागील स्वमालकीच्या इमारतीत श्वानांच्या निर्बिजीकरणासाठी सुसज्ज ABC केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने माध्यमांमधून मिळालेली माहिती आणि प्रत्यक्ष निरीक्षणात काही अनियमितता आढळून आली. याची दखल घेत संबंधित एजन्सीकडून कामकाजाच्या पद्धतीचा अहवाल मागविण्यात आला असून, कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाबाबत कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर ABC केंद्रातील स्वच्छता, पिंजऱ्यांची व्यवस्था, श्वानांना दिले जाणारे खाद्य आणि त्यांच्या देखभालीच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यात आली आहे.

निर्बिजीकरणानंतर ५ ते ७ दिवस निरीक्षणाखाली ठेवणार

मोकाट श्वान पकडल्यानंतर सर्वप्रथम त्यांची पशुवैद्यकीय तपासणी केली जाते. आरोग्यदृष्ट्या सक्षम असलेल्या श्वानांचेच निर्बिजीकरण व लसीकरण केले जाते. निर्बिजीकरणानंतर त्यांना ५ ते ७ दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येते. प्रकृती स्थिर झाल्यानंतर अँटी रेबीज लस देऊन ज्या परिसरातून त्यांना पकडण्यात आले होते, त्याच परिसरात पुन्हा सोडण्यात येते. निर्बिजीकरण झालेल्या श्वानांची ओळख पटावी यासाठी त्यांच्या उजव्या कानावर विशिष्ट ओळखचिन्ह करण्यात येते.

ABC नियमांनुसार नगरपंचायतीकडून केंद्राची व्यवस्था, पशुवैद्यकीय सेवा, आवश्यक मनुष्यबळ, साहित्य व उपकरणे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच स्थानिक प्राणी जन्म नियंत्रण समितीला सहकार्य करणे, मोहिमेच्या नोंदी ठेवणे आणि आवश्यक अहवाल तयार करणे ही कामेही केली जात आहेत.

दरम्यान, नागरिकांनी मोकाट श्वानांना विनाकारण मारहाण किंवा त्रास देऊ नये, असे आवाहन नगरपंचायतीने केले आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांनी विशेष काळजी घ्यावी. आक्रमक श्वान, श्वानांचा कळप किंवा रेबीजची संशयास्पद लक्षणे आढळल्यास स्वतःहून कोणतीही कार्यवाही न करता नगरपंचायतीला माहिती द्यावी. तसेच पाळीव श्वानांचे नियमित लसीकरण व निर्बिजीकरण करून त्यांना मोकाट सोडू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.