डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाचे उद्यापासून खेडी येथे ग्रामीण पुनर्रचना निवासी शिबीर
चिपळूण (प्रतिनिधी) : नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) +2 स्तरांतर्गत ग्रामीण पुनर्रचना निवासी शिबिराचे आयोजन दि. २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत जिल्हा परिषद शाळा क्रमांक १, खेर्डी दातेवाडी येथे करण्यात आले आहे. यावर्षीच्या शिबिराचे ब्रीदवाक्य ‘नशा एवं टीबी मुक्त युवा’ असे असून युवकांमध्ये व्यसनमुक्ती, क्षयरोग प्रतिबंध, आरोग्य जागृती, सामाजिक बांधिलकी आणि ग्रामविकासाची भावना निर्माण करणे हा या शिबिराचा प्रमुख उद्देश आहे.
शनिवार दि. २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता शिबिराचा उद्घाटन समारंभ होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७ ते ८ या वेळेत पत्रकार योगेश बंडागळे यांचे ‘पत्रकारिता : काल, आज आणि उद्या’ या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. रविवार दि. २९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत प्रा. विनायक बांद्रे यांची सूत्रसंचालन कार्यशाळा तर सायंकाळी ७ ते ८ या वेळेत प्रा. अमित शेवडे यांचे ‘सायबर फ्रॉड अवेअरनेस’ या विषयावर मार्गदर्शन होईल. सोमवार दि. ३० नोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत ॲड. नयना पवार यांचे कायदेविषयक मार्गदर्शन होणार आहे. सायंकाळी ७ ते ८ या वेळेत पोलीस उपनिरीक्षक मीरा महामुने या ‘विद्यार्थ्यांचे योग्य वर्तन व POCSO कायदा’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मंगळवार दि. १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त सकाळी ८ वाजता जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. दुपारी ३ ते ५ या वेळेत एस. डी. कोळी यांचे क्षयरोग जनजागृतीपर मार्गदर्शन तर सायंकाळी ७ ते ८ या वेळेत प्रा. सुहास वाघमोडे यांचे ‘Decoding the Language of Animals’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. बुधवार २ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता प्रा. अरुण जाधव यांचे ‘जलसंवर्धन : आजची बचत, उद्याची सुरक्षितता’ या विषयावर मार्गदर्शन होईल. सायंकाळी ७ वाजता प्रा. डॉ. डी. टी. कदम हे ‘राष्ट्रीय सेवा योजनेतील युवकांची भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. गुरुवार ३ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता ध्वनीचित्रफितींचे सादरीकरण करण्यात येणार असून रात्री ९ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, ४ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता शिबिराचा सांगता समारंभ होणार आहे.
या शिबिराच्या निमित्ताने विविध आरोग्यविषयक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. २८ नोव्हेंबर रोजी आरोग्य तपासणी शिबिर, तर ३० नोव्हेंबर रोजी नेत्रतपासणी शिबिर आणि लहान मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. याशिवाय शिबिराच्या कालावधीत पथनाट्य सादरीकरण, श्रमदान, बौद्धिक कार्यक्रम, पहाटेचा परिपाठ, महिला सक्षमीकरणविषयक उपक्रम तसेच ग्रामस्वच्छता आणि जनजागृतीपर विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक ज्ञान न घेता समाजातील प्रश्न समजून घेऊन सामाजिक परिवर्तनाचे सक्रिय दूत बनावे, आरोग्यदायी व व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करावा आणि ग्रामीण विकासात योगदान द्यावे, हा या निवासी शिबिरामागील मुख्य हेतू आहे. अशी माहिती राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. अविनाश पालशेतकर यांनी दिली.













