जाकादेवी महावितरण कार्यालयात राडा
रत्नागिरी : प्रतिनिधी
वीज जोडणीच्या कामाला विलंब झाल्याच्या रागातून एका ग्राहकाने थेट महावितरणच्या शाखा कार्यालयात घुसून राजेंद्र शंकर पवार (वय ४४, रा. जाकादेवी) या अधिकाऱ्यावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना जाकादेवी (चाफे) येथे घडली आहे. या हल्ल्यात कार्यालयातील लॅपटॉपचीही तोडफोड करण्यात आली असून, याप्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रसाद गजानन देसाई (४१,रा.चिंचवाडी, मांजरे संगमेश्वर ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित हल्लेखोराचे नाव आहे. त्याचा जाकादेवी येथे आर.ओ. (R.O.) प्लांट आहे. या प्लांटसाठी असलेले ४ किलो वॅटचे वीज कनेक्शन बंद करून नवीन ९ किलो वॅट थ्री-फेज कनेक्शन मिळावे, यासाठी त्याने २४ नोव्हेंबर २०२६ रोजी महावितरणच्या जाकादेवी (चाफे) शाखा कार्यालयात अर्ज केला होता. मात्र, या कनेक्शनला विलंब होत असल्याने देसाई संतापला होता. याच रागातून आरोपी प्रसाद देसाई याने शुक्रवार २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.५२ वा. सुमारास तक्रारदार अधिकारी यांना मोबाईलवर फोन करून शिवीगाळ केली व “तुला संपवतो” अशी जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर
शुक्रवारी दुपारी ३.४० वाजता राजेंद्र पवार हे जाकादेवी शाखा कार्यालयात कर्तव्य बजावत असताना देसाई थेट कार्यालयात घुसला. त्याने पवार यांना शिवीगाळ करत “जागीच ठार करतो” अशी धमकी देऊन कार्यालयातील लॅपटॉप आपटून फोडला. एवढ्यावरच न थांबता, त्याने आपल्या दुचाकीवरून आणलेला चाकू काढून पवार यांच्या पोटात खुपसण्याचा प्रयत्न केला.
प्रतिकार केल्याने बचावले प्राण
अचानक झालेल्या या हल्ल्यात राजेंद्र पवार यांनी प्रसंगावधान राखत आरोपीला जोरदार प्रतिकार केला आणि कार्यालयातून पळ काढला. यावेळी आरोपीने त्यांचा पाठलाग करत “जेलमधून बाहेर आल्यावरही तुला ठार मारणार,” अशी धमकी दिली.
दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी राजेंद्र पवार यांनी जयगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार
सरकारी कामात अडथळा आणणे, शिवीगाळ, दमदाटी, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे आणि चाकूने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रात्री ८.३० वाजता संशयित आरोपी प्रसाद गजानन देसाई याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम १०९(१), १२१(१), १३२, ३५२, ३५१(२) आणि ३२४(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास जयगड पोलीस करत आहेत.













