महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वे प्रशासनाकडून विशेष सुरक्षा व्यवस्था; प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत महत्त्वपूर्ण चर्चा
चिपळूण (प्रतिनिधी) : भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर दादर रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. शनिवार, दि. २८ नोव्हेंबर २०२६ रोजी पार पडलेली ही बैठक खेळीमेळीच्या आणि सकारात्मक वातावरणात संपन्न झाली.
दादर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम, दादर रेल्वे स्थानक व्यवस्थापक तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे (आरपीएफ) अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे (MRPM) अध्यक्ष, फळ, फूल व भाजीपाला विक्रेते आणि फेरीवाले श्रमिक संघटनेचे (PPBVFSS) अध्यक्ष तसेच रेल्वे मंत्रालयाच्या केंद्रीय रेल्वे सल्लागार समितीचे (ZRUCC) सदस्य अभिजीत धुरत यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीमध्ये रेल्वे प्रवाशांची सुरक्षितता, सध्याची परिस्थिती, प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या आणि आगामी ६ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या सुरक्षा उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी देशभरातून लाखो अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमीवर येतात. त्यामुळे दादर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होते. ही बाब लक्षात घेऊन रेल्वे पोलीस आणि आरपीएफ यांच्याकडून विशेष बंदोबस्त व सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाते.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की, रेल्वे पोलीस प्रवाशांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असून, महापरिनिर्वाण दिनाच्या काळात प्रवाशांची विशेष काळजी घेतली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही दादर रेल्वे स्थानकात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस यंत्रणा दक्ष राहणार आहे.
प्रवाशांनी आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी लोहमार्ग पोलीस (GRP) यांचा १५१२ आणि रेल्वे सुरक्षा बलाचा (RPF) १३९ हा हेल्पलाइन क्रमांक नोंदवून ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे पोलिसांकडून ‘खाकीतील सखी’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
या बैठकीला महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे विलास जाधव, विलास खैरे, मिलिंद कदम, सदानंद राजपूत, संदीप जोईल, पी. आर. तांबे, सचिन नागवेकर, शहाजी माने, दीपाली इरगुटकर, पुष्पा बेलेकर, अरुणा हळदणकर, मेघना दर्जी, नामदेव गुडये, राकेश मोहिते, प्रकाश तळेकर, विलास चव्हाण, जितेंद्र साखरे, विनायक शिर्के, झनक शिर्के, भिकाजी कांबळे, नामदेव शिंदे, सन्नी गायकवाड, रवींद्र इंगळे यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि रेल्वे प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरमध्ये येणाऱ्या अनुयायांचा रेल्वे प्रवास सुरक्षित, सुखकर आणि सुरळीत व्हावा, यासाठी रेल्वे प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि प्रवासी संघटनांनी समन्वयाने काम करण्याचा सकारात्मक निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.












