गुहागर/प्रतिनिधी – चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पाटपन्हाळे उपकेंद्रात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान राबविण्यात आले. पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी महिलांची तपासणी करुन त्यांना औषधोपचार करण्यात आले. तसेच तज्ञ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
या उपक्रमात चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डाँ. शशिकला वाडकर, आरे उपकेंद्राचे डाँ. अक्षय सानप, परिचारिका माधुरी घावट, आरोग्य सहाय्यक सिध्दार्थ भालेराव, कीटक समाहारक पर्यवेक्षक वाडकर, नथुराम जानवळकर, पंढरीनाथ पप्पूलवार, वरवेली उपकेंद्राचे डाँ. गायकवाड, सर्व आरोग्य सेविका, आरोग्यसेवक, आशासेविका, अंगणवाडी सेविका, बचतगट पर्यवेक्षक आदी सहभागी झाले होते. या सर्वांनी उपस्थित महिलांची रक्ततपासणी, मधुमेह, रक्तदाब, नेत्र, दंतरोग, स्तन व गर्भाशय मुख व मुख कर्करोग तपासणी, गरोदर महिलांसाठी प्रसुतीपूर्व तपासणी, क्षयरोग तपासणी, सिकसेल आजार व रक्तक्षय तपासणी करुन विशेष तज्ञांचे मार्गदर्शन करण्यात आले.
या अभियान उपक्रमाला गुहागरचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे, पाटपन्हाळे सरपंच विजय तेलगडे, उपसरपंच असीम साल्हे, ग्रा.पं. सदस्य नेज्ञतज्ञ डाँ. जोशी, बालरोग तज्ञ रुपाली कुष्टे, आरजीपीपीएलचे डाँ. दीपक जाधव, वैद्यकीय अधिकारी व त्यांची टीम, वशिष्ठी क्लिनिकच्या डाँ. मुग्धा नार्वेकर, आरोग्य निरीक्षक भालेराव यांनी भेट दिली. दरम्यान, पाटपन्हाळे उपकेंद्रात कर्मचाऱ्यांची कमतरता असूनही परिचारिका माधुरी घावट या येथील रुग्णांना योग्य सेवा देत आहेत. रात्री-अपरात्री प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांनाही योग्य सेवा देत असून त्यांच्या या सेवेचे या अभियानात कौतुक करण्यात आले. या उपक्रमात पोषण व पोषक आहाराच्या पदार्थांची मांडणी करण्यात आली होती. तसेच स्वागतासाठी विविध प्रकारच्या सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. या उपक्रमाला पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे मोलाचे सहकार्य लाभले. आरजीपीपीएल कंपनीकडूनही डाँक्टरांची टीम व मेडीसीन पुरविण्यात आली होती.













