‘संघर्ष समिती’च्या माध्यमातून आंदोलनाची रणनीती निश्चित
दोडामार्ग : प्रतिनिधी
तिलारी खोऱ्यात हत्तींच्या मुक्त संचारामुळे होणारे काजू पिकाचे प्रचंड नुकसान आणि वनविभागाची उदासीनता याविरोधात आता शेतकऱ्यांनी आरपारच्या लढाईची तयारी केली आहे. बुधवारी केर येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत ‘हत्ती संघर्ष समिती’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाला जागे करण्यासाठी टप्प्याटप्प्याने आंदोलन छेडण्याची रणनीती आखण्यात आली आहे.
केर येथे ग्रामस्थ आणि वनविभाग यांच्यात पार पडलेल्या या बैठकीला शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, सावंतवाडी विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, मोर्लेचे माजी सरपंच गोपाळ गवस, उपसरपंच तेजस देसाई यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. यावेळी १३ जणांची प्राथमिक समिती स्थापन करण्यात आली असून, लवकरच इतर बाधीत गावातील प्रतिनिधींचा समावेश करून समिती पूर्ण केली जाणार आहे.
थेट आंदोलनापूर्वी लोकप्रतिनिधींना या जिल्हाव्यापी प्रश्नाचे गांभीर्य पटवून देण्यासाठी शिष्टमंडळ भेट घेणार आहे. यामध्ये खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे यांच्या भेटी घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या जाणार आहेत. खासदार राणे यांची वेळ घेऊन तातडीने चर्चा केली जाईल, असे श्री. निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
बैठकीत ग्रामस्थांनी २०१८ पासून प्रलंबित असलेल्या समस्यांचा पाढा वनविभागाच्या अधिकाऱ्यांसमोर वाचला. दरवर्षी वनविभागाकडून मिळणारी तीच ती रटाळ उत्तरे ऐकून शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. यापुढे ठोस निर्णय आणि आश्वासन देणारे वरिष्ठ अधिकारी येणार असतील, तरच बैठका घ्या, असा सज्जड दमही ग्रामस्थांनी वनविभागाला दिला आहे.
काजू हंगामात हत्तींनी केलेल्या नुकसानीची तरतूद नसल्याचे कारण सांगून वनविभाग हात झटकत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. त्यामुळे आता केवळ आश्वासन नको, तर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
यावेळी तुकाराम देसाई, रत्नकांत देसाई, हर्षद देसाई, विष्णू देसाई, शिवराम देसाई, सगुण नाईक, शंकर देसाई, मंगेश देसाई, राघोबा देसाई, नारायण देसाई, महेंद्र देसाई, प्रकाश देसाई, अनंत देसाई, पोलीस पाटील सर्वेश देसाई व शेकडो शेतकरी उपस्थित होते.












