पीएच.डी. पदवीप्राप्त डॉ. विवेक चव्हाण यांचा गौरव
शिरगाव (प्रतिनिधी) : शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा वेंगुर्ले येथील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. विवेक चव्हाण यांनी मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेच्यावतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
यावेळी शिरगाव हायस्कूल शाळा समितीचे चेअरमन विजयकुमार कदम यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, डॉ. चव्हाण यांचा शैक्षणिक प्रवास ग्रामस्थ व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या आई-वडिलांकडून लाभलेला शैक्षणिक वारसा त्यांनी जपला असून त्याचे यशस्वी रूपांतर या पीएच.डी. पदवीत झाले आहे. कष्ट, जिद्द आणि सातत्य यांच्या बळावर मिळवलेले हे यश संस्था व शाळेसाठी अभिमानास्पद आहे. कृषी क्षेत्रातील त्यांचे संशोधन जिल्ह्याच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सत्काराला उत्तर देताना डॉ. विवेक चव्हाण म्हणाले की, शाळेने केलेला हा सन्मान व गुरुजनांनी दिलेली कौतुकाची थाप माझ्यासाठी आनंददायी असून पुढील शैक्षणिक वाटचालीस ऊर्जा देणारी आहे. या सत्कारामुळे जबाबदारी अधिक वाढली असून आपल्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थी, शेतकरी, सर्वसामान्य नागरिक तसेच समाजहितासाठी करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचे संचालक अमित साटम, मिलिंद साटम, राजेंद्र शेट्ये, मानद अधीक्षक संदीप साटम, शाळा समिती सदस्य दिनेश साटम, संतोषकुमार फाटक, पोलीस पाटील चंद्रशेखर साटम, केंद्रप्रमुख बापू खरात, सेवानिवृत्त कला शिक्षक प्रफुल्लचंद्र चिंदरकर, मुख्याध्यापक शमशुद्दीन आत्तार, महेश चौकेकर, बाबी दुसणकर, स्वप्नील हिंदळेकर आदी उपस्थित होते.












