‘सभापती आपल्या दारी’ उपक्रमाची घोषणा; पावसाळ्यापूर्वी कामे मार्गी लावण्याचे आदेश
दोडामार्ग (सुहास देसाई):दोडामार्ग पंचायत समितीची मासिक सभा नुकतीच सभापती पार्वती गवस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत विविध विभागांच्या रखडलेल्या कामांवरून सदस्यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. वारंवार सूचना देऊनही अनेक महत्त्वाचे खाते प्रमुख बैठकीला अनुपस्थित राहिल्याने सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
यावेळी व्यासपीठावर उपसभापती गणेशप्रसाद गवस, सदस्य संजय सातार्डेकर, नेहा गवस, सायली निबाळकर, सोनिया कुबल आणि सहाय्यक गटविकास अधिकारी यशवंत गवस उपस्थित होते.
बांधकाम विभागावर ताशेरे; कोलझर बंधारा वादाच्या भोवऱ्यात
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि अभियंता बैठकीला गैरहजर राहिल्याने उपसभापती गणेशप्रसाद गवस यांनी प्रशासनाला धारेवर धरले. एका क्लार्कने माहिती देण्याचा प्रयत्न केला असता, “तुम्ही शाखा अभियंता आहात का? एवढे अधिकारी असताना तुम्हाला का पाठवले?” असा सवाल सदस्यांनी विचारला. कोलझर येथील २७ लाख रुपये खर्चाच्या बंधाऱ्याचे इस्टिमेट जागेवर न जाता केल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे लांबी-रुंदी कमी भरली असून नदीपात्र मोठे असल्याने कामात अडथळा येत आहे. यावर ७ मे रोजी प्रत्यक्ष पाहणी करून तोडगा काढण्याचे निश्चित झाले.
८ शाळा ‘शून्य शिक्षकी’; २८ शिक्षक अतिरिक्त
शिक्षण विभागाचा आढावा घेताना धक्कादायक माहिती समोर आली. तालुक्यातील ८ शाळांमध्ये एकही शिक्षक नसल्याने त्या ‘शून्य शिक्षकी’ झाल्या आहेत. तालुक्यात २८ पदवीधर शिक्षक अतिरिक्त असून त्यांच्या समायोजनाचा ठराव जिल्हा स्तरावर पाठवण्याचे निर्देश देण्यात आले. यामुळे रिक्त जागांचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.
‘जलजीवन’ची कामे निधीअभावी रखडली
जलजीवन मिशन अंतर्गत ठेकेदारांची बिले थकीत असल्याने कामे अपुरी असल्याची बाब समोर आली. तेरवण-मेढे योजनेत पाणी कमी पडत असल्याने तेथे बोअरिंग घेण्याची मागणी सायली निबाळकर यांनी केली. जिल्ह्याला ३७५ कोटी मंजूर असले तरी केंद्र व राज्याचा हिस्सा वेळेत मिळणे आवश्यक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
पावसाळी नियोजन व अन्य निर्णय:
कृषी विभाग: महाडीबीटी, जायफळ लागवड आणि पावसाळ्यापूर्वी बी-बियाणे वाटपाचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. वैयक्तिक शेततळ्यांसाठी ७५ हजार रुपयांपर्यंत अनुदान उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.
वनविभाग व हत्ती प्रश्न: हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी उपाययोजना, सौर दिवे वाटप आणि जीर्ण वीज खांब बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या.
सुरक्षा: तालुक्यातील फार्म हाऊसमध्ये चालणारे अवैध धंदे आणि मागेली धबधब्यासारख्या पर्यटन स्थळी सुरक्षा वाढवण्यासाठी पोलिसांना पत्र देण्याचे ठरले.
घरकुल: ५०१ घरकुलांपैकी ३२१ कामे तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले.
विशेष उपक्रम: ‘सभापती आपल्या दारी’
ग्रामीण भागातील समस्या जाणून घेण्यासाठी सभापती पार्वती गवस यांनी ‘सभापती आपल्या दारी’ हे अभियान जाहीर केले आहे. या दौऱ्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:
७ मे २०२६: मणेरी
८ मे २०२६: कोलझर
२१ मे २०२६: झारेबाबर
२२ मे २०२६: मटाणे
२८ मे २०२६: कोनाळ
२९ मे २०२६: साठेली भेडशी
या मोहिमेत सरपंच, ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींशी थेट संवाद साधून तक्रारींचे निवारण केले जाणार आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आदेश सभापतींनी सर्व विभागांना दिले आहेत.












