एक राखी सैनिकांसाठी’ लांजा हायस्कूलचा सलग २८ वर्षे उपक्रम

लांजा हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी पाठविल्या राख्या व संदेशपत्रे

लांजा (प्रतिनिधी) : न्यू इंग्लिश स्कूल व तु. पुं. शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय, लांजा च्या इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींनी ‘एक राखी सैनिकांसाठी’ या उपक्रमांतर्गत राख्या तसेच संदेश पत्रे पाठवून
देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून अहोरात्र जागता पहारा देत मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. विशेष म्हणजे २८ वर्षे लांजा हायस्कूलच्या विद्यार्थिनी कडून हा उपक्रम राबवला जात आहे
या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींनी आपल्या सैनिक बंधूंसाठी प्रेमाने राख्या तयार करून पाठविल्या. तसेच सैनिकांना प्रोत्साहन देणारी, त्यांच्या शौर्याला सलाम करणारी आणि देशसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी पत्रेही लिहिली. सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या सैनिकांपर्यंत आपल्या भावना पोहोचाव्यात, या उद्देशाने विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमादरम्यान माजी सैनिक नायब सुभेदार साळवी आणि सैनिक पाटी यांचा प्रशालेच्या वतीने गौरव करण्यात आला. त्यांच्या देशसेवेच्या कार्याला अभिवादन करत विद्यार्थिनींनी त्यांच्याप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त केली.
या प्रसंगी प्रशालेचे उपमुख्याध्यापक वाघाटे , पर्यवेक्षक रवींद्र वासुरकर , सहाय्यक पर्यवेक्षिका श्रीमती पाटील तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते.
सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना राखीच्या माध्यमातून बहिणीच्या प्रेमाची आणि विद्यार्थिनींच्या शुभेच्छांची ऊब मिळावी, तसेच त्यांच्या त्यागाची जाणीव समाजातील प्रत्येक घटकाला व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. ‘देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या हातावर राखी आणि मनात कृतज्ञतेची भावना’ असा संदेश देत हा उपक्रम भावनिक वातावरणात संपन्न झाला.