दोडामार्ग । प्रतिनिधी :
तालुक्यातील साटेली-भेडशी येथे रविवारी रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास भरधाव दुचाकी घसरून भीषण अपघात घडला. या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणारे दोघे युवक गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी दोडामार्ग येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दानिश हुसेन सय्यद (२१) व मुंतसिर मशुद सय्यद (२२, दोघेही रा. आवाडे) अशी जखमींची नावे आहेत. दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, दोडामार्गहून साटेली-भेडशीच्या दिशेने दोघे युवक दुचाकीवरून जात होते. त्यांची दुचाकी अत्यंत भरधाव वेगात असल्याने साटेली-भेडशी येथील मैदानाजवळ आलेल्या तीव्र वळणावर चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी घसरून रस्त्यावर जोरात आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही युवकांच्या डोक्याला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या तोंडातून आणि डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील स्थानिकांनी प्रसंगावधान राखून तातडीने मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून दोन्ही गंभीर जखमींना उपचारासाठी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात हलवले. रुग्णालयात डॉक्टरांकडून त्यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही अपघातस्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला.












