चिपळूण (प्रतिनिधी) : डीबीजे महाविद्यालयात दिनांक २० ऑगस्ट रोजी डीबीजे महाविद्यालय, चिपळूण येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत स्वयंसेवकांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ. राहुल मराठे सर आणि विभागीय समन्वयक डॉ. युवराज पाटील सर उपस्थित होते.
डॉ. मराठे यांनी आपल्या मार्गदर्शनातून स्वयंसेवकांमध्ये व्यक्तिमत्व विकास, सामाजिक जबाबदारी आणि शिस्तीचे महत्त्व अधोरेखित केले. तर डॉ. पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजनेतील विविध शिबिरे, पुरस्कारांचे स्वरूप आणि स्वयंसेवकांद्वारे राबवता येणाऱ्या समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. या व्याख्यानाचा स्वयंसेवकांनी अत्यंत उत्सुकतेने लाभ घेतला आणि आपले कर्तव्य व जबाबदारी समजून घेऊन पुढे वाटचाल करण्यासाठी प्रेरित झाले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रा. चेतन खांडेकर, प्रा. विराज ओक व विद्यार्थी स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.पायल कोतळूककर हिने केले तर प्रा. करिष्मा सागवेकर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे सभासद प्राध्यापक, स्वयंसेवक बहुसंख्येने उपस्थित होते.













