शिरोड्यातील ‘ताज’ प्रकल्पामुळे सिंधुदुर्गच्या पर्यटनाला गती; भाजप युवा मोर्चा दोडामार्ग कडून जोरदार जल्लोष!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांचे विशेष कौतुक; महायुती सरकारचे मानले आभार 

दोडामार्ग :सुहास देसाई

 

सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाला मोठी चालना देणाऱ्या वेंगुर्ला-शिरोडा येथील बहुप्रतिक्षित ‘ताज’ पंचतारांकित हॉटेल प्रकल्पाचा मार्ग सुकर झाल्याच्या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता युवा मोर्चा दोडामार्गच्या वतीने उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला. महायुती सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांबद्दल युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी विशेष आभार व्यक्त केले.

वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा येथे ‘ताज’ सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन ब्रँडचे आगमन झाल्यामुळे सिंधुदुर्गच्या पर्यटनाला जागतिक स्तरावर एक नवी आणि ठळक ओळख मिळणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे केवळ पर्यटन क्षेत्राचाच विस्तार होणार नसून, स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील आणि इतर पूरक व्यावसायिकांनाही मोठी चालना मिळेल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.

सिंधुदुर्गच्या अफाट पर्यटन क्षमतेला जागतिक व्यासपीठावर नेण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलेल्या विशेष पुढाकाराचे भाजयुमो दोडामार्गकडून मनापासून कौतुक करण्यात आले. महायुती सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची गती वाढली असून, येत्या काळात सिंधुदुर्ग हे जागतिक पर्यटन नकाशावर अग्रक्रमाने झळकेल, असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी भाजप उपाध्यक्ष श्री. आनंद तळणकर, शहर अध्यक्ष श्री. राजेश फुलारी, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष पराशर सावंत, युवा मोर्चा शहर अध्यक्ष ओमकार रेडकर, शहर उपाध्यक्ष राज बोन्द्रे, युवा मोर्चा कार्यकारिणी सदस्य आकाश नाईक, सुरज नाईक, श्रेयश गवस, भीमसेन नाईक, ओम तुमरे, महादेव तर्पे, आणि शिवाजी नाईक यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.